पावसाच्या शक्यतेमुळे भात झोडणीच्या कामाला गती

 

  • पोलादपूर तालुक्यात मनुष्यबळाअभावी होतेय नुकसान

पोलादपूर : तालुक्यातील भातशेतीच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी मनुष्यबळाअभावी शेतीची कामे करणे शक्य नसल्याने घट होत असून हाती आलेल्या भातपिकाच्या झोडणी मळणीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये होणाऱ्या वादळापूर्वी दोन दिवस सलग पावसाची दाट शक्यता व्यक्त होत असताना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवडयात भिजलेले भातपीक पुन्हा डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी भिजू नये, यासाठी भात झोडणीच्या कामाला गती मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्यातील शेतकरी ढगाळ वातावरणात शेतातील भातपिकाची उडवी आणि भारे झोडून भाताची मळणी करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे दृश्य. (छाया-शैलेश पालकर)

पोलादपूर-कापडे, कापडे-कामथे, कोंढवी-गोलदरा, तुर्भे-दिवील, कोतवाल, देवपूर आणि अन्य भागात काही शेतकऱ्यांची कापणी होताच रस्त्यालगत, अंगणात अन् खळयात भात सुकवायची सुरूवात झाली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण जनतेच्या हातात उमेदवारांनी आमिषाच्या स्वरूपात दिलेल्या पाचशेच्या नोटांनी शेतीच्या कामाकडे दूर्लक्ष झाले आणि मतदान व मतमोजणी पूर्ण होताच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले भातपिक सुकण्याऐवजी भिजले. यानंतरचे दोन आठवडे सकाळी व संध्याकाळी थंडी आणि दुपारी उन्हं असल्याने भातपिक सुकविण्यासाठी उडवीतील भारे उलटसुलट करून ठेवावे लागत होते. आता हे भारे सुकू लागले असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होण्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवस पुन्हा पाऊस पडण्याचा हवामानाचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांद्वारे तसेच वृत्तपत्रांमधून वर्तविण्यात आल्यामुळे भात झोडणी तसेच मळणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील 4200 हेक्टर भातशेतीच्या लागवड क्षेत्रातील किमान 55 टक्के कापणीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे 25 हजारांहून अधिक खातेदार शेतकरी असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.

पोलादपूर तालुक्यात पिक विमा आणि फळपिक विम्याचे हप्ते देण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभा असलेला शेतकरी पावसाच्या शक्यतेमुळे पुन्हा शेतातून आणलेल्या भातपिकाच्या रक्षणासाठी काकुळतीला आला आहे. शेतमजूरांअभावी शेतकरी शेजारधर्म पाळण्याप्रमाणे भातझोडणी मळणी आदी कामांसाठी एकमेकांना सहकार्य करताना दिसून येत आहेत.

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE