कोकणचा निसर्ग कुंचल्याच्या माध्यमातून पुण्यातील चोखंदळ रसिकांच्या भेटीला!


निसर्गचित्रकार विष्णू परीट यांचे चित्रप्रदर्शन
मुद्रा गॅलरीत १२ ते १७ डिसेंबर दरम्यान पहाण्याची संधी

संगमेश्वर : कोकणच्या निसर्गाची भुरळ देशविदेशातील पर्यटकांना पडते तशीच ती कवी , लेखक आणि चित्रकारांनाही पडत असते. इचलकरंजीच्या कबनूर गावातील कलाकार विष्णू गोविंद परीट कलाशिक्षक म्हणून संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे या गावी आले आणि त्यांना कोकणच्या निसर्गाने अक्षरशः वेडं केले . विद्यार्थ्यांना कलेचे धडे देत असताना सातत्याने निसर्गासोबत मैत्री करत आपल्या कुंचल्याने निसर्गाची विविध रुपे चितारण्यात त्यांनी आनंद मानला.

कलाशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर परीट यांच्या कुंचल्याने अधिक वेग घेतला आणि त्यांनी निसर्गाची अक्षरशः शेकडो चित्रे चितारली. यातील काही निवडक निसर्ग चित्रांचे प्रदर्शन पुणे येथील मुद्रा आर्ट गॅलरीत १२ ते १७ डिसेंबर दरम्यान भरत असून रसिकांना यातील अप्रतिम कलाकृती खरेदी करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे .

सुखम गॅलरीचे चित्रकार सचिन भुयेकर आणि मनाली सैतवडेकर हे दोघे कला क्षेत्रात एक आश्वासक चळवळ उभी करण्यासाठी धडपडत आहेत . कलामहाविद्यालयांसह कलाकारांना विविध प्रकारचे कलासाहित्य अल्प किंमतीत उपलब्ध करुन देणे , नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे यासह कलाकारांना आर्ट गॅलरी उपलब्ध करुन देवून त्यांना प्रोत्साहीत करणे यासाठी सुखम प्रयत्नशील आहे. चित्रकार मनोज सुतार यांचे शिष्य असलेले सचिन भुयेकर निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांना भेटले आणि त्यांच्या कलाकृती पाहून त्यांनी परीट यांनी चितारलेला कोकणचा निसर्ग खजिना पुण्यातील चोखंदळ रसिकांना पहाण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्याचे ठरवले . सचिन आणि मनाली यांनी चित्रकार विष्णू परीट यांची निवडक चित्र घेऊन सातारा रोड , नातूबाग डीमार्टच्या समोर असणाऱ्या मुद्रा गॅलरीत १२ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान ” साऊंड ऑफ कलर ” या नावाने चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता ख्यातनाम चित्रकार सुहास एकबोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून यावेळी कलाक्षेत्रातील विविध मान्यवर चित्रकार आणि समीक्षक उपस्थित रहाणार आहेत .

सदर प्रदर्शन १२ ते १७ डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी १० : ३० ते रात्री ८ : ३० पर्यंत रसिकांना पहाता येणार आहे . या संधीचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुखमचे चित्रकार सचिन भुयेकर आणि मनाली सैतवडेकर यांनी केले आहे.

प्रवाही आणि फ्रेश रंग हे विष्णू परीट यांच्या चित्रांचे खास वैशिष्ट्य . ते चित्रात रंग ओततांना आपला जीवही ओतत असल्याने त्यांची चित्रे अधिक जीवंत होतात . पाणी जसे वाट काढत जाते , त्या वेगाने विष्णू परीट यांचे रंग चित्रात पसरत जातात . हिरव्या रंगाच्या अनेक जवळपासच्या छटा साकारत त्यांनी माळरानावर, डोंगर उतारावर दाखवलेले गवत , तळपायाच्या मुलायम स्पर्शाला आसूसले भासते . ग्रामीण जीवन , ग्रामीण भाग , शेतकरी, निसर्ग , समुद्र किनारे हे त्यांच्या चित्रांचे मुख्य विषय असतात . त्यांनी तयार केलेला गवताचा रंग , त्याच्या रंगपेटीत तर नसतोच पण रंगाच्या दुकानातही सापडणं कठीण. निसर्गाच्या रंगपेटीतून तो थेट विष्णू परीट यांच्या बोटात उतरतो. हे साकारण्यासाठी कलेप्रती समर्पण असावे लागते आणि ते या अवलीया कलाकाराच्या रोमारोमात भरले आहे . रंगाचा तजेलदारपणा अखेरपर्यंत कायम राखण्यात त्यांना नेहमीच यश येते . टवटवीत रंग , चित्रात खोली निर्माण झाल्याचा भास आणि प्रत्येकाला आपलासा वाटेल असा विषय हे गुण त्याच्या चित्रात नेहमी असतात . एखादा विषय अन्य कलाकारांच्या दृष्टीने चित्राचा नसतो तरीही असा आव्हानात्मक विषय निवडून ते त्यात जीव ओतून वैशिष्ट्यपूर्ण बनवतात . या रंगांनी विष्णू परीट यांना ओळख दिली. त्यांची चित्रे महाराष्ट्रासह विदेशातील चित्र संग्राहकांकडे आहेत तसेच आजवर त्यांना अनेक पारितोषिके प्राप्त झाली असून त्यांची असंख्य प्रदर्शने विविध ठिकाणी भरली आहेत ही बाब नक्कीच अभिमानास्पद म्हणावी लागेल. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम ,कोकणचे चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, चित्रकार माणिक यादव ,चित्रकार दत्ता हजारे, प्रा. धनंजय दळवी, उद्योजक विक्रांत दर्डे आदींनी विष्णू परीट यांना प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE