https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गणपतीपुळे येथे २५ डिसेंबरपासून मिनी सरस विक्री प्रदर्शन

0 323

रत्नागिरी, दि.२३ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय मिनी सरस व जिल्ह्याचे सरस व प्रदर्शन 2023 दि. 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये श्री क्षेत्र, गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी प्रतिवर्षी जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. हे प्रदर्शन श्री क्षेत्र, गणपतीपुळे येथे 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या विक्री व प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्हा व कोकण आणि पुणे विभागातील जिल्हे मिळून एकूण 75 बचत गट सहभागी होणे अपेक्षित आहे. विभागस्तरीय मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री हे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वरोजगारिनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते.


या विक्री व प्रदर्शनामध्ये बचत गटांनी उत्पादीत विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी), विविध प्रकारचे घरगुती मसाले, पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहयाचे, ओव्याचे इत्यादी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी), कोकम, आगळ इत्यादी, कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे इत्यादी), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी), रस, कोकणी खादयपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी), जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकमकलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इत्यादी) माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.


या प्रदर्शन कालावधीमध्ये संध्याकाळी स्वयंसहाय्यता समुहातील सदस्य यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामुहिक कार्यक्रम असणार आहेत. तसेच सहभागी स्टॉल प्रतिनिधींकरिता फनी गेम आयोजित करण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाचा सांगता समारंभ 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 3 वाजता होणार आहे. त्यावेळी सहभागी स्वयंसहायता समुहातील उत्कृष्ट मांडणी, सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समुहाचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.