होळीनिमित्त आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप
सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांचा उपक्रम
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : आदिवासी बांधवांसाठी सतत आशेचा किरण बनून राहिलेले सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्यामार्फत होळीनिमित्त आदिवासी आणि वस्तीवर गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी याही वर्षी आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवत रानसई येथील खोंड्याची वाडी, मार्गाची वाडी,भुर्याची वाडी,बंगल्याची वाडी, खैरकाठी, सागाची वाडी, केळ्याचा माळ,वेश्वी आदिवासीं वाडी ह्या सर्व आदिवासी वाड्यांवरील बांधवांच्यां कुटुंबाची होळी आनंदीत व्हावी म्हणून त्यांना या वर्षी तब्बल २५० ( अडीचशे किलो ), चणे – हरभरेे प्रत्येक वाडीवर तीस किलो,पंचवीस किलो या प्रमाणे वाटप केले.
प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा रंग भरणारा रंगोत्सव म्हणजेच शिमगोत्सव आणि याच उत्सवाला अनादी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य राजू मुंबईकर यांनी रानसई येथील सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां होळीच्या सणा निमित्त प्रेमाची भेट देऊन त्यांना भरल्या मनाने शुभेच्छा देखील दिल्या.त्यांच्या सोबत ह्या आनंददायी रंगोत्सवाच्या क्षणी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक स्नेहल पालकर,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्रजी पाटील,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत व केअर ऑफ नेचर संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
होळी सणाच्या निमित्ताने राजू मुंबईकर यांनी आदिवासीं बांधवां करिता दिलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भेंट मिळाल्यावर त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं होळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि होळीच्या भावनिक रंगात न्हाऊन गेला.