- एलईडी बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी ट्रॉलर जप्त करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांची सूचना
रत्नागिरी : एलईडीवर बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा. ट्रॉलर जप्त करा. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी, अशी सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र. सहाय्यक आयुक्त आनंद पालव, प्रविण गोळवलकर, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त ना. वि. भादुले, सीमाशुल्क अधीक्षक पवन राठी, निरीक्षक राजेश लाडे आदी उपस्थित होते.
सविस्तर आढावा घेवून श्री. राणे म्हणाले, मत्स्य उत्पादन वाढविणे, त्यासाठी नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि सागरी सुरक्षा करणे, हा आपल्या विभागाचा उद्देश आहे. किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामे किती आहेत, किती बोटींची नोंदणी आहे, किती बोटी चालतात याबाबतचा अहवाल द्यावा. पारदर्शकपणे अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. ज्यांच्यावर दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून 100 टक्के वसुली करण्यात यावी. देशाचे, राज्याचे उत्पादन वाढवायचे असेल तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांचे उत्पन्न वाढायला हवे. सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे.
शासनाकडून ज्या तुमच्या मागण्या आहेत, त्या निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. परंतु, अधिकाऱ्यांनी त्यांची मानसिकता बदलावी. पारदर्शक कार्यवाही करण्यासाठी इच्छाशक्ती निर्माण करावी. उत्पादन वाढीसाठी वेगळी संकल्पना सादर करावी. निश्चितपणे त्याचा विचार करु. कारभारात बदल न दिसल्यास त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी कॉफीटेबल बुक देऊन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांचे सुरुवातीला स्वागत केले.
