अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार

लांजा : पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार होणार आहे. गुरुवार, दिनांक २१ मे ते सोमवार, दिनांक २५ मे २०२६ अर्थात अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी ते दशमी (शके १९४८) या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ मे रोजी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रधान संकल्प, गणपतिपूजनपूर्वक नांदी श्राद्धान्त पुण्याहवाचन, आचार्य, ऋत्विक्वरण, देवतास्थापन, ग्रहमख आदी कार्यक्रमांनी संहिता हवनाला सुरुवात होणार आहे. २२ मे ते २५ मे या कालावधीत सर्व दिवस दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत हवन होणार असून, २३ आणि २४ मे रोजी सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत वेदमूर्ती गोडबोले गुरुजी यांचे ‘आध्यात्मिक नजरेतून नक्षत्रदर्शन’ या विषयावर प्रवचन होणार आहे. २४ मे रोजी रात्री १० वाजता प्रवचन संपल्यानंतर आरत्या-भोवत्या होणार आहेत. २५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुती, आशीर्वाद, कर्मसमाप्ती आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

तीन वर्षांपूर्वीच्या अधिक मासावेळी संस्थानात ऋग्वेद संहिता स्वाहाकार करण्यात आला होता. कुलोपासक व भक्तमंडळींचे उत्तम सहकार्य लाभल्याने तो कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला होता. यंदाही श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या कृपेने सर्वांचे तन-मन-धन रूपाने सहकार्य लाभेल आणि कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडले, असा विश्वास संस्थानाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आर्थिक मदतीसाठी बँक खात्याचे तपशील : श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ
बँक ऑफ महाराष्ट्र, लांजा शाखा
बचत खाते क्रमांक : ६०११२६७९१५७
आयएफएससी कोड : MAHB0001382

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE