https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

एसटी बस दुर्घटनेतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाचे आर्थिक सहाय्य

0 72

कार्यवाहीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एसटी महामंडळाला निर्देश

   मुंबई दि 18 : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिकरी यामधील नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळली.

   बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी संवाद साधून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटने संदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच  एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील  सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

            जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक           ०२५७-२२२३१८० आणि ०२५७-२२१७१९३ असा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.