कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वातानुकूलित गाड्यांच्या आणखी विशेष फेऱ्या
कोकण रेल्वेकडून एलटीटी ते मंगळूर दरम्यान अतिरिक्त गाड्यांचे नियोजन
बावीस डब्यांची वातानुकूलित एलएचबी गाडी धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर याआधीच जाहीर करण्यात आलेल्या एलटीटी- मंगळुरू गणपती स्पेशलच्या फेर्या वाढविण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर दरम्यान( 01165 /01166) विशेष गाडी जाहीर करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आताही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 16, 23, 30 ऑगस्ट तसेच सहा सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर दरम्यान धावणार आहे. परतीच्या प्रवासात या गाडीच्या वाढीव फेऱ्या दिनांक 16 , 23, 30 ऑगस्ट तसेच सहा सप्टेंबर रोजी होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गाडी रात्री बारा वाजून 45 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी ती मंगळुरूला सायंकाळी साडेसात वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळुरू येथून रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसला सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचेल.
मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर दरम्यान ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी थिवी, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा होनावर, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड, बिंदुर, कुन्दापुरा, उडुपी, मुलकी सुरतकल या स्थानकांवर थांबे घेणार आहे. ही गाडी 22 एल एच बी श्रेणीतील कोचसह धावणार आहे.