चाफे येथील मयेकर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
रत्नागिरी : तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावर्षी गणेशोत्सवामुळे हा दिवस सुट्टी मध्ये येऊन गेला. परंतु महाविद्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या दिनाचे महत्व लक्षात घेता आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद असे ज्ञान देणाऱ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रति असणारा आदर व्यक्त केला. त्या नंतर दिवसभराचे शैक्षणिक कामकाज विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक,प्राध्यापिका क्लार्क, ग्रंथपाल, शिपाई अशा विविध भूमिकांमधून उत्तम प्रकारे बजावण्याचा प्रयत्न केला.
दिवसभराच्या कामकाजानंतर शिक्षक रुपी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आणि शिकवणे यामध्ये असणारा फरक लक्षात आला. प्रत्येक गोष्टीमागे प्राध्यापकाची शिस्त, कष्ट सृजनशीलता, नाविन्याचा ध्यास, विद्यार्थ्यांची काळजी, प्रेम, कधी कठोरता अशा विविध गुणांची ओळख होण्यासाठी आजचा दिवस आमच्या आयुष्यातील अनुभवाचा खजिना आहे असे मत विद्यार्थीरूपी प्राचार्य बनलेल्या आनंद नेवरेकर याने व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ स्नेहा पालये यांनी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकरुपी माणसाचा आदर करा आणि यशस्वी व्हा असा मूलमंत्र देत सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालालाच्या प्र प्राचार्य स्नेहा पालये, प्रा अवनी नागले, प्रा शामल करंडे, प्रा तेजश्री रेवाळे, प्रा दिपाली सावंत व विद्यार्थी उपस्थित होते