माखजन हायस्कूलचे एम. के. नामजोशी सर यांचे निधन

रत्नागिरी : गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करणारे मोहन तथा एम. के. नामजोशी (वय-६९) यांचे दोन दिवसापूर्वी हृदयविकाराने निधन झाले. माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा सुरु असताना सभेत बोलतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसून ते जागीच कोसळले ते जगाचा शेवटचा निरोप घेऊनच.

एम. के. सरांच्या निधनानिमित्त त्यांचे विद्यार्थी असलेल्या श्री. सुरेश भायजे यांनी त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली….!

गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड हरपला!


एम. के. सरांच्या या जगातून जाण्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड हरपला आहे. २००४ ला त्यांचं हृदयाच ऑपरेशन झालं होतं, हृदयाची एक झडप काम करत नसल्याने त्या ऐवजी कृत्रिम झडप बसवण्यात आली होती. माझ आठवी ते दहावी शिक्षण माखजन हायस्कूलमध्येच झालं. एम. के. नामजोशी सर माझे खूप आवडते सर होते आणि मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो. त्यामुळे गुरु शिष्या पलीकडचे. आगदी जवळचे नाते आमच्यात होते. १९९७ ला जेव्हा मी जिल्हा परिषद ला उभा राहिलो तेव्हा तू शंभर टक्के निवडून येणार असा आशीर्वाद देणारे माझे ते पहिले सर होते. पुढे विकास कामांच्या बाबतीत मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. समोरून जाता येताना कधी भेट झालीच तर आम्ही थांबलो नाही एकमेकाची चौकशी केली नाही असं कधीच झाले नाही, एवढं अतूट नातं आमच्यात निर्माण झालं होतं.


त्यांच ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा ते मला म्हणाले की माझ्या हृदयाची कृत्रिम झडप बसविण्यात आले आहे हे किती वर्ष टिकेल याचा काही भरोसा नाही मी आज आहे कदाचित उद्या नसेनही, फुलाच्या पाकळी एवढी एक से,मी,आकाराची छोटी झडप पण तिची जर किंमत २५लाख असेल, तर आपल्या देहातील सर्व अवयवांची एकूण किंमत किती करोड होऊ शकते? म्हणून मी हा माझा देह वाया जाऊ देणार नाही.


एम. के. नामजोशी सर तब्बल सतरा वर्षांपूर्वी ते जे बोलले तेच आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले ,त्यांनी डेरवण हॉस्पिटलला आपला देहदान केला. हृदयाचा ऑपरेशन होऊन तब्बल सतरा वर्षे काढली, यालाच जगण्याची जबरदस्त “इच्छाशक्ती” म्हणतात, त्याचाही प्रत्यय आला. उभ्या आयुष्यात त्यांनी शेकडो गोरगरीब कष्टकऱ्यांच्या गरजू मुलांना शालेय साहित्य पासून फी पर्यंतची मदत केली आहे. मला एकदा ते सहज म्हणाले, हायस्कूलमध्ये ९०टक्के मुले ही कुणबी समाजाची आहेत म्हणून तुम्ही या संस्थेत नेतृत्व केलं पाहिजे. तुम्ही संस्थेचे सभासद व्हा, सभासद व्हा अशी कायम मागणी माझ्याकडे असायची केवळ त्यांच्या आग्रहास्तवच मी त्या संस्थेत सभासद झालो. दोन दिवसापूर्वीही मी सर्वसाधारण सभेसाठी माखजन हायस्कूलला निघालो होतो, पण तब्येत ठीक नसल्याने घरातून जाण्यास मज्जाव केल्याने मी घरीच थांबलो, त्यामुळे त्यांची शेवटची भेट होऊ शकली नाही, हे शल्य काय मनात बोचत राहणार आहे. त्यांच्या निधनाने माखजन पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे सर पुन्हा होणे नाही. माझ्या या आदर्शवत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • श्री. सुरेश भायजे, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE