२० जानेवारीपासून अंमलबजावणीला रेल्वे बोर्डाची मंजुरी
सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेसचं असं असेल वेळापत्रक
रत्नागिरी दि २२ सप्टेंबर : कोकणवासीय प्रवाशांच्या पसंतीची सीएसएमटी मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस 20 जानेवारीपासून सुपरफास्ट होणार आहे. रेल्वे बोर्डाने यासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान, २० जानेवारीपासून सुपरफास्ट म्हणून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसचे रेल्वेच्या बुकिंग प्रणालीवर आरक्षण देखील सुरु झाले आहे. एक्सप्रेस ऐवजी सुपरफास्ट एक्सप्रेस झाल्यामुळे या गाडीच्या तिकीट दरातही बदल झाला आहे.
सध्या कोकण कन्या एक्सप्रेस रत्नागिरी ते दादरपर्यंतचे स्लीपर श्रेणीचे तिकीट 265 रुपये आहे. गाडी सुपरफास्ट झाल्यानंतर सुपरफास्टचा तीस रुपये चार्ज वाढून हे तिकीट 295 रुपये होणार आहे. त्याचबरोबर वातानुकूलित टायरच्या प्रवासासाठी सध्या रत्नागिरी ते दादर पर्यंत 705 रुपये तिकीट मोजावे लागते. 20 जानेवारी पासून ते सुपरफास्ट चा 45 रुपये चार्ज पकडून 750 रुपये होणार आहे. रेल्वेच्या 120 दिवस आधी आगाऊ आरक्षण या नियमानुसार सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस से 20 जानेवारी 2023 या तारखेचे आरक्षण सुरू देखील झाली आहे. उद्या शुक्रवारपासून 21 जानेवारीचे आरक्षण देखील खुले होईल.
सध्या ही गाडी १०१११ आणि १०११२ या प क्रमांकसह धावते मात्र २० जानेवारी पासून ते २०१११ आणि २०११२ असे होतील.
सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), खेड (३.०४), चिपळूण (३.३०), संगमेश्वर (४.०२), रत्नागिरी (४.४५), विलवडे (५.३४), राजापूर (५.५०), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६), थिवीम (८.१०), करमाळी (८.३२) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल.
त्याच बरोबर मडगावहून मुंबईकडे निघणारी २०११२ ही गाडी मडगावहून संध्याकाळी ७.०० वाजता निघेल.पुढे करमाळी (रात्री ७.४०), थिवीम (रात्री ८), पेडणे (रात्री ८.१२), सावंतवाडी ( रात्री ८.३६), कुडाळ (रात्री ९.००), सिंधुदुर्ग (रात्री ९.१२), कणकवली (रात्री ९.२८), वैभववाडी ( रात्री ९.५६), राजापूर (रात्री १०.१४), विलवडे (रात्री १०.२८), रत्नागिरी (रात्री ११.१५), संगमेश्वर रोड (रात्री ११.५५), चिपळूण (रात्री १२.२८), खेड (रात्री १२.५५), पनवेल ( पहाटे ३.५५), ठाणे (पहाटे ४.४२), दादर (पहाटे ५.१२), मुंबई सीएसएमटी (पहाटे ५.४०) वाजता पोहोचेल.
कोकण कन्या एक्सप्रेस सुपरफास्ट झाल्यानंतर काही छोटे थांबे रद्द होणार असल्याची चर्चा होती. मात्र कोकण रेल्वेने याबाबत जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार आधीच्या कुठल्याही थांब्यामध्ये बदल झालेला नाही. मात्र रायगडमधील माणगाव येथील थांबा जो कोविड काळात रद्द झाला आहे तो मात्र सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेसच्या जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये रद्दच असल्याचे पाहायला मिळत आहे















