रत्नागिरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी येथील सांस्कृतिक सभागृहात “जागतिक ज्येष्ठ नागरीक दिवस” कार्यक्रम संपन्न झाला.
सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील शासन निर्णय दि.०९.०९.२०१८ मधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद असून सदर शासन निर्णयान्वये ज्येष्ठ नागरीकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांचा वृध्दपकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे. शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. वृध्दपकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्याचे सर्वसमावेश धोरण निर्गमित आले असून त्याबाबत उपस्थितांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, ज्योत्सना पडीयार, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी, यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र गावडे, विस्तार अधिकार, पंचायत समिती, रत्नागिरी, जनसेवा फाऊंडेशन तसेच ज्येष्ठ नागरीकांकरीता चालवित असलेल्या हेल्पलाईनचे रत्नागिरी व सिंधुदूर्ग विभागाचे प्रमुख आनंद पुजारी यांनी ज्येष्ठांच्या विविध अडचणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रास्ताविकपर भाषणात यादव गायवकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी त्यांचे विचार व्यक्त करून सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरीकांना कसा करुन देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीक म्हणून वसंत झगडे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरीक संघ, जे. पी. जाधव, श्री. सावंत यांनी त्यांना येणाऱ्या अडीअडचणी यावर विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात जिल्हयातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील कर्मचारी व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
















