नवरात्रीत श्री मरूधर विष्णू समाजातर्फे भागवत कथा सप्ताह
रत्नागिरी : कलियुगाचा विद्यमान काळ हा आपत्तीचा आणि विपत्तीचा रहाणार आहे. जागतिकस्तरावर अशांतता निर्माण होत आहे. कलियुगातील या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताच्या नामाचाच आधार आपल्याला घेतला पाहिजे. प्रतिदिन नेमाने भगवंताचे नामस्मरण केल्यास आपण निश्चितच तरुन जाऊ शकतो, असे आशीर्वचनपर प्रतिपादन पूजनीय संत श्री अनुजदासजी यांनी केले.

नवरात्रनिमित्त श्री मरूधर विष्णू समाज सेवा समिती, रत्नागिरीतर्फे २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन खेडशी येथील श्री मरूधर समाज भवन येथे करण्यात आले होते. यावेळी पू. श्री अनुजदासजी यांच्या ओजस्वी वाणीतून हज़ारों हिंदू बांधवांनी भागवत कथा श्रवण केली. पू. श्री अनुजदासजी हे राजस्थानमधील असून उच्च कोटिचे भागवत कथा निरुपणकार असून भागवत कथेच्या माध्यमातून हिंदू समाजाला जागृत करण्याचे कार्य अव्याहतपणे करत आहेत.
पू. श्री अनुजदासजी पुढे म्हणाले की, श्रीराम अवतारात श्री हनुमंत आणि वानर सेनेने श्रीराम लक्ष्मणासह रावणाविरुद्धच्या युद्धात सहभाग घेऊन बलाढ्य अशा राक्षस सेनेला पराभूत केले. श्रीकृष्ण अवतारात वस्त्रहरणाच्या प्रसंगात असाहाय्य झालेल्या द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचा बचाव केला. आपण जर दैनंदिन गोष्टी करताना भगवंताच्या नामाचे स्मरण करत राहिलो, तर भगवंत सर्वतोपरी आपली काळजी घेणारच आहे. यासाठी आपण निष्ठेने आणि श्रध्देने नामस्मरण करणे आवश्यक आहे.
भागवत कथा सप्ताहात पू. श्री अनुजदासजी यांनी भागवत माहात्म्य, वराह अवतार, शिव विवाह, नरसिंह अवतार, राम, कृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा, कृष्ण – उद्धव संवाद, भागवत धर्म आदी विषयांवर आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतून निरूपण केले.
श्री मरूधर विष्णू समाज सेवा समिती, रत्नागिरीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा नवरात्रानिमित्त भागवत कथा सप्ताहाचे नियोजन श्री मरुधर समाजाचे अध्यक्ष श्री. थानजी प्रजापत, तसेच सर्वश्री दीपकसिंह देवल, नरपत सिंह, रविंद्रसिंह राणावत आदी कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या केले.














