अलिबाग, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र “गरुडझेप” मार्फत उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा नियोजन भवन येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अलिबाग तालुक्यातील 145 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
“कोणतही काम पूर्ण होईपर्यंत अशक्य वाटत असते. मात्र परिश्रम आणि चिकाटी याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून कोणत्याही परीक्षेला सामोर जाता येते,” अशा उत्स्फूर्त शब्दांत उपस्थित तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, परिविक्षाधीन तहसिलदार अक्षय ढाकणे, नायब तहसिलदार श्रीम. श्रद्धा चौगुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आत्मज मोरे, मुंबईतील देवनार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र तांबे यांनी प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

















