रायगडमधील महाड तालुक्यातील के. ई.एस. व्ही.एच.परांजपे शाळेची निवड
अलिबाग : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, UNDP व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने RIKA INDIA या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 34 शाळा-महाविद्यालयांमध्ये नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्या मदतीने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
हे मॉकड्रिल नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी त्या-त्या शाळा/महाविद्यालयातील संबंधित शिक्षकांशी समन्वय साधून दि.28 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबर 2022 या कालावधीत पार पडणार आहेत. या मॉक ड्रिलमध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
या मॉक ड्रिलसाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील के.ई.एस.व्ही.एच.परांजपे या शाळेची निवड करण्यात आली आहे.
या मॉक ड्रिलमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात करता येईल. विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉक ड्रिलच्या माध्यमातून मिळेल, अशी माहिती समादेशक व वरिष्ठ प्रशासिक अधिकारी (प्रशिक्षण) नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई श्रीमती राजेश्वरी कोरी यांनी दिली आहे.















