स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी उरण नगर परिषदेचे वाचनालय पूर्ण वेळ खुले

मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि ग्रंथपाल संतोष पवार यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण उपक्रम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, खेडोपाडी ‘गरुडझेप’ ही संकल्पना राबविली जात आहे. या गरुडझेप स्पर्धा उपक्रमातून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच ग्रामीण भागातही गरुडझेप स्पर्धा परिक्षा अभ्यासिका विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पर्धा परिक्षेबाबत जनजागृती व्हावी या अनुषंगाने गरुडझेप उपक्रमाची सुरवात केली. या उपक्रमाला स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शना खाली उरण तालुक्यात उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयात गरुड झेप स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरु करण्यात आली होती. या वाचनालयात दररोज अनेक विद्यार्थी येत असतात. सकाळी 8:30 ते 11:30 तर दुपारी वाचनालयाची वेळ 4:30 ते रात्री 8 असे असल्याने स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांना पूर्ण वेळ एकाच ठिकाणी बसून अभ्यास करता येत नव्हता. जेव्हा वाचनालय उघडेल तेंव्हा त्यांना यायला लागत होते व जेव्हा वाचनालय बंद होत असे तेव्हा स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांना काही अधिकचा वेळ वाचनालयात बसण्यासाठी मिळायचा पण तोही अपूरा मिळत होता . नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन उरण नगर परिषदेचे उरण शहरात असलेले उरण नगरपरिषदचे माँसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय दर रविवारी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णवेळ चालू ठेवण्याचा निर्णय वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मान्यतेने घेतला. तो निर्णय आज कृतीत प्रत्यक्षात उतरविला . आज रविवार दिनांक 4/12/2022 रोजी पहिल्या दिवशी 3 विद्यार्थीनी आणि 5 विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. दर रविवारी पूर्णवेळ अभ्यासिका या उपक्रमाचा शुभारंभ आज रविवार दिनांक 4/12/2022 पासून सकाळी 8:30 वाजल्या पासून करण्यात आला. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी गरुडझेप उपक्रमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास सांगितले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषदेतील माँ साहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी दर रविवारी पूर्णवेळ वाचनालय चालू ठेवण्याचा निर्णय तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले असल्याचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी सांगितले. MPSC,UPSC स्पर्धा परिक्षा तसेच विविध पदासाठी असलेल्या स्पर्धा परिक्षेचे पुस्तके वाचनालयात उपलब्ध असून विदयार्थ्यांना ते पुस्तके मोफत वाचायला मिळणार आहे. त्यामूळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष पवार यांनी केले आहे.

स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रविवारी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत वाचनालय चालू राहणार असल्याने स्पर्धा परिक्षेच्या देविना मुंबईकर, हेमंत भोईर, शुभम गौडदाब, मयुर पाटील, अभिषेक कोळी, रश्मी म्हात्रे, प्रज्वली घरत, इम्रान खान, दिपक वायदंडे या विद्यार्थ्यांनी हि सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, मुख्याधिकारी राहूल इंगळे आणि ग्रंथपाल संतोष पवार, कर्मचारी जयेश वत्सराज यांचे आभार मानले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE