भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य: चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ व आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मा. मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.
















