रत्नागिरी : अमरावती ते वीर दरम्यान दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दरम्यान कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार नवीन अमरावती येथून ही विशेष गाडी (01101) दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील वीर स्थानकात ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
ही अनारक्षित गाडी परतीच्या प्रवासाला दिनांक ११ फेब्रुवारी रोजी निघणार आहे. वीर ते नवीन अमरावती मार्गावर धावताना ही गाडी (01102) वीर येथून रात्री दहा वाजता निघेल आणि 12 फेब्रुवारी 25 रोजी ती नवीन अमरावतीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. जनरल श्रेणीचे 16 आणि एस एल आर दोन अशी एकूण 18 डब्यांची ही गाडी धावणार आहे.
दि. ७ फेब्रुवारी रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात येते. माता रमाबाई तथा रमाबाई आंबेडकर यांचे माहेरघर दापोली तालुक्यातील वणंद येथे आहे. तेथूनच काही अंतरावर मंडणगड तालुक्यात आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे येथे बाबासाहेबांचे स्मारक आहे. वीर जवळच महाड शहरात ऐतिहासिक चवदार तळे आहे. या तिन्ही ठिकाणी अमरावती, बीड भागातून अनुयायी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी ही गाडी असावी, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
विशेष गाडीचे थांबे
बडनेरा, मूर्तीजापुर, अकोला, शेगाव, नंदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा.