संगमेश्वर : तालुक्यातील करंबेळे येथे असलेल्या धरण परिसरात रविवारी गवारेडा मृतावस्थेत आढळून आला. या गव्यावर त्याच ठिकाणी वन विभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार करंबेळे धरण क्षेत्रात गवारेडा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तेथील पोलीस पाटील श्री. खाके यांनी वन विभागाला दिली. यानंतर रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफीक मुल्ला व वनरक्षक अरूण माळी, वनरक्षक राजाराम पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व पंचनामा केला.
देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांच्यामार्फतही मृत गव्याची पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. त्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर डॉ. कदम यांनी गव्याचे शवविच्छेदन केले. यामध्ये गव्याचा हार्ट अँटँकने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.















