देवरुख ( सुरेश सप्रे ) : देवरुख आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात कला शाखेची बारावीची दृष्टीहीन विद्यार्थिनी संस्कृती ब्रीद हिने ७७.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संस्कृती ही जन्मताच दृष्टीहीन आहे. संस्कृतीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले आहे. आजी आजोबा साडवली येथे राहतात म्हणुन तीने बारावीला देवरुख महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मनोहर शिर्के व सौ. मनिषा शिर्के हे तिचे आजी आजोबा तिच्यासाठी मार्गदर्शक ठरले. मनोहर शिर्के संस्कृतीसाठी देवदूत ठरले आहेत.
साडवलीतून ते संस्कृतीला बसने महाविद्यालयात घेवून येतात व परत घरी घेवून जातात.याबाबत संस्कृतीने आजी आजोबा,प्राध्यापक व वर्गमैञींनी यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे संस्कृती शिक्षण घेत आहे.
बारावीनंतर तीला बी.ए.बी.एड.तसेच संगित विशारद करुन शिक्षक बनायचे असून यासाठी स्पेशल एज्युकेशन मिळाले तर तीला फायदा होणार आहे, असे तीचे म्हणणे आहे. संगणक शिकण्याची हि तीची इच्छा आहे मात्र हलाखिची परिस्थिती असलेने मोठा अडथळा ठरत आहे. ती हार्मोनियम वाजवून गाणी देखिल गात आहे.अनेक ठिकाणी तीचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत.
संस्कृतीच्या गायन कलेचे पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक!
मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिच्या गायन कलेचे कौतुक करत तीला आशीर्वाद दिले होते. संगीतात शेवटची परीक्षा देवून ती संगीत विशारद होणार आहे.गाण्याचे वर्ग घेण्याचीही इच्छा आहे. कॅसिओ वादनाचे, तबला वादनाचे धडेही ती गिरवत आहे.
गरीब परिस्थिती त्यात व्यंधत्वाचा शाप हे सगळे स्विकारुन संस्कृती शिकत आहे.तीची इच्छाशक्ती जबरदस्त असुन तीला योग्य ते मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळाली तर ती आपले ध्येय पुर्ण करू शकेल.
अशा दृष्टीहीन संस्कृती ब्रीदला मदतीचा हात देवून तिला स्वावलंबी बनविण्यासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन करणेत येत आहे..














