रत्नागिरी : होणार होणार म्हणून गेले काही दिवस चर्चा सुरू असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी अखेर काउंट डाऊन सुरू झाले आहे. शुभारंभासाठी कोरा करकरीत सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसचा रेक मडगावमध्ये काही तासांपूर्वी दाखलही झाला आहे. या गाडीला पंतप्रधान हिरवा बावटा दाखवणे अपेक्षित असल्याने यासाठी सर्व तयारी मडगाव स्थानकात करण्यात आली आहे.

संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोकण रेल्वेच्या मार्गावर नेमकी कधी सुरू होणार, याबाबत मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान ही गाडी चालवण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आली. त्यामुळे आता या गाडीला हिरवा झेंडा नेमका कधी दाखवला जातो याची चर्चा सुरू झाली होती. ती प्रतीक्षा आता संपली आहे.
चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी मधून मडगाव मुंबई मार्गावर चालवण्यासाठी आठ डब्यांची नवी कोरी गाडी गोव्यात मडगाव यार्डात उभी आहे. शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर मडगाव जंक्शन मध्ये रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे.
आता या गाडीला नेमका हिरवा झेंडा कधी दाखवला जातो, गाडीचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार याबाबतची उत्सुकता प्रवाशांमध्ये आहे. रेल्वेकडून या गाडीच्या उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा कधी होते याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.














