चाचणी झाली, नवी गाडी येऊन गोव्यात जुनी झाली, मडगाव- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुहूर्त सापडेना!
रत्नागिरी : ‘होणार होणार म्हणून गेले काही महिने बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर ठरले!…. त्यासाठी मंडप सजला नवरी आली… वऱ्हाडी देखील फेटे बांधून तयार!! पण भटजीचा नाही पत्ता!’, अशीच काहीशी अवस्था उद्घाटनासाठी यार्डात पडून असलेल्या मुंबई-मडगाव मार्गावरील बहुचर्चित वंदे एक्सप्रेसबाबत झाली आहे.
देशातील 15-16 मार्गांवर धावू लागलेली व संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली सेमी हाय स्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ कोकण रेल्वेच्या मार्गावर नेमकी कधी सुरू होणार, याकडे कोकणवासीय जनतेचे लक्ष लागले होते. अखेर गेल्या आठवड्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान तिची ‘ट्रायल रन’ यशस्वी झाली आणि कोकणवासीय जनतेची प्रतीक्षा लवकरच संपणार यावर शिक्कामोर्तब झाले.

चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमधून कोकण रेल्वे मार्गावर धावण्यासाठी नव्या कोऱ्या आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्यातील मडगाव यार्डात आली आणि आधी जी माहिती मिळाली होती त्यानुसार तिला दि. २९ मे रोजी हिरवा झेंडा दाखवला जाईल, अशी शक्यता बळवली. रेल फॅन्स आणि रेल्वेविषयक हौशे-गौशे यांच्यासाठी वंदे भारत कोकण रेल्वे मार्गावर धावण्यासाठी दाखल झाल्याची बातमी सुखावून गेली. वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाची सारी तयारी मडगाव जंक्शनमध्ये करण्यात आली. त्यासाठी तिला हिरवा झेंडा दाखवल्या जाणाऱ्या संभाव्य प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी अगदी ट्रॅकची सुद्धा रंगरंगोटी करण्यात आली. मात्र, मडगाव यार्डात गाडी दाखल होऊन सुद्धा 29 मे रोजी गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गे मुंबई पर्यंत धावणाऱ्या पहिल्या वहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची छबी टिपण्यासाठी सज्ज असलेल्यांचा हिरमोड झाला.
रेल्वे सुत्रांचा हवाला देऊन प्रसार माध्यमांमध्ये आधी बरीच चर्चा झाल्याप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भरत एक्सप्रेसचा 29 मे रोजी चा मुहूर्त चुकल्याने आता दिनांक ३ किंवा ५ जून रोजी मडगावमधून मुंबईसाठी हिरवा झेंडा दाखवला जाईल, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, या आधीचा अनुभव पाहता आता ती माहिती देखील किती ऑथेंटिक मानायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस असो की मडगाव- एलटीटी डबल डेकर एक्सप्रेस असो या गाड्यांच्या शुभारंभा वेळेचा अनुभव पाहिला तर रातोरात दुसऱ्या झोनमधून रेक शिफ्टिंग करून या गाड्या धावू देखील लागल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी त्यावेळचा तो एक सुखद अनुभव ठरला होता.
मात्र, याच मुंबई ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने सगळ्यांचे अंदाज चुकवले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी मुंबई-मडगाव मार्गावर धावणार असलेल्या बहुचर्चित सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसची अवस्था
‘मंडप सजला, नवरी आली, वऱ्हाडीही फेटे बांधून तयार पण भटजीचा नाही पत्ता!’ अशी झाली आहे.














