देवरुख (सुरेश सप्रे ) : भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी प्रतिक्रीया देत केलेला दावा हास्यास्पद असून काल आम.निकमसरांनी आपण अजीतदादा बरोबरच असल्याचे स्पष्ट केलेने अधटराव यांचे आमदारकीचे तिकीट मिळण्याचे स्वप्न भंग झाल्याने वैफल्यग्रस्त झाल्याने ते माझ्यावर टीका करून वरिष्ठांची सहानुभूती मिळवण्यासाठी व प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा पलटवार माजी जि.प.अध्यक्ष व उ.बा.ठा. सेने चे युवा नेते रोहन बने यांनी केला.
पालकमंत्री नाम. उदय सामंत हे पाहुणे म्हणून आले त्यांचे मी स्वागत केले. ते माझे कर्तव्य होते. तसेच भोजनाचा कार्यक्रम हा पूर्वनियोजितच होता. त्यात गौप्यस्फोट कसला? आपल्या युती सरकारमधील मंत्री आमच्याकडे आले त्यांच्यासह आपणही आला असतात तर आपले ही स्वागत केलेच असते. पालकमंत्री आमच्याकडे आले याचे शल्य प्रमोद अधटराव यांना का व्हावे, असा सवाल रोहन बने यानी केला.
राज्यातील घडामोडीनंतर आम. शेखर निकम यांनी मी अजीत दादा समवेत ठामपणे उभा असल्याचे जाहीर केल्याने प्रमोद अधटराव यांना आपली नाराजी लपविणे कठीण झाल्याने माझ्यावर केलेली टीकाटिप्पणी ही वैफल्यग्रस्त झाल्याचे द्योतक असल्याचा टोला रोहन बने यानी हाणला आहे.
आज राज्यात अत्यंत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. अजित दादा पवारांसह राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संगमेश्वर चिपळुणचे विद्यमान आमदार शेखर निकम यानी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आ. निकम यांच्या निर्णयामुळे भाजपाचे विधानसभा प्रभारी अधटराव यांची वरिष्ठांनीच गोची केल्याने त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली असल्याने ते सहन न झाल्याने माझ्यावर आरोप करीत नाराजी लपविणेचा प्रयत्न करत आहेत.. तसेच त्यांनी निष्ठेच्या बाता करुच नयेत, असेही रोहन बने यांनी सांगत अधटराव यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला.














