दाभोळ ते पेढे जलमार्गाबाबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी आ. शेखर निकम यांची चर्चा

देवरूख ( सुरेश सप्रे) : दिल्ली येथे केंद्रीय बंदर विकास, जल वाहतूक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी भेट घेऊन दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूर नियंत्रण प्रकल्प तसेच पर्यटन संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला ही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या जलमार्गाच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आम. शेखर निकम यांचे गेले दोन वर्ष ना. श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या प्रकल्पामुळे चिपळूण शहराच्या पूर नियंत्रणाला ही फायदा होणार आहे.

चिपळूण शहर पूर नियंत्रणाबाबत केंद्राकडे पाठवायच्या प्रस्ताबाबत आम. निकम यांनी नाम. श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली. यासाठी संपूर्ण वाशिष्टी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत सखोल सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्याचीही माहिती यावेळी नाईक यांना दिली.

चिपळूण शहर पूर नियंत्रणासाठी आमदार निकम यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि बंदर नौकानयन, जलवाहतूक मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या दोन महत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त आपल्या मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पर्यटन विकासाच्या कामाबाबतही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या कामांबाबतही आम. निकम यांनी यावेळी नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या तिन्ही कामाबाबत ना. नाईक यांनी खूपच सकारात्मक चर्चा करून कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले आहे.

दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ आणि पेढे येथील नियोजित रोरो आय डब्ल्यू टी टर्मिनलला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आम. निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे या भेटीत आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE