संगमेश्वरच्या पैसा फंड प्रशालेत स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक

संगमेश्वर दि. १६ ( प्रतिनिधी ) : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागात प्रशालेचा माजी विद्यार्थी चित्रकार हेमंत सावंत याने शासकीय रेखाकला परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

चित्रकार हेमंत सावंत याचे माध्यमिक शिक्षण पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्येच झाले आहे . शासकीय रेखाकला परीक्षेत त्याने अ श्रेणी प्राप्त केली होती . कलेची आवड असल्याने याच क्षेत्रात करीयर करायचे असे ठरवून त्याने सह्याद्री कला महाविद्यालयात जी. डी. आर्ट पर्यंतचे शिक्षण घेतले . कलाक्षेत्रात डिजीटल ज्ञान आवश्यक असल्याने हेमंत सध्या पुणे येथे ॲनिमेशनचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत हेमंत याने पैसा फंड येथे आर्ट गॅलरी उभारण्यात मोठी मेहनत घेतली होती.

शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांना स्थिर चित्र आणि स्मरणचित्र हे विषय काहीसे कठीण जातात यामुळे पैसा फंडच्या कला विभागातर्फे या दोन विषयांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला जातो. कलावर्गात १ जुलै पासून रेखाकला परीक्षेसाठी जादा तास सुरु झाले असून आजवर १५ स्थिर चित्रे, १२ स्मरण चित्रे, १५ संकल्प चित्रे, ०७ अक्षरलेखन असा चित्रांचा सराव झाला आहे. कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी आज स्थिर चित्र विषयाचे प्रात्यक्षिक चित्रकार हेमंत सावंत याने दाखविले आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. जलरंगात काम करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत हेमंतने सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रशालेत येवून प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि प्रशालेच्या कला विभागातर्फे हेमंत सावंतचे आभार मानण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE