गेली अनेक वर्षे २१ दिवस साजरा होतोय उत्सव
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख पोलिस वसाहती शेजारील पोलिसांचा ‘देवरुखचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील हनुमान मंदिरातील गणरायाला २१व्या दिवशी आज सोमवारी मिरवणुकीने भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. यावेळी सैतवडे येथील एस. डी. बेन्जो पार्टी मिरवणुकीचे खास आकर्षण ठरणार आहे.
जय हनुमान मित्र मंडळ देवरुख व पोलीस कर्मचारी देवरुख यांच्या वतीने हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे २१ दिवस गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना गणपती उत्सवात २४तास सेवा बजवावी लागते म्हणून हा उत्सव भक्तिभावाने होऊन पोलिसांना ही मनोभावे सहभागी होता यावे म्हणून हा नवसाला पावणार म्हणून ख्याती असलेल्या गणरायाची सेवा २१ दिवस केली जाते. श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते.
या वर्षी उत्सव विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. यामध्ये दररोज श्रींची पूजा अर्चा, आरती, भजन, जाखडी नृत्य, टिपरी नृत्य सादर झाले. सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हि देवरूखात येत या गणरायाची दर्शन घेत.
या उपक्रमाचे कोतूक केले. या देवरूखचा राजा श्रींच्या मूर्तीचे आज विसर्जन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता विसर्जन मिरवणुकीला मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. स्टेट बँक रोड, एस.टी. स्टँड, बाजारपेठ, खालची आळी मार्गे सप्तलिंगी नदी अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात सप्तलिंगी नदीपात्रात गणरायाचे जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.














