लंपीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील


रत्नागिरी : जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घेवून आपल्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, रत्नागिरी न. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार बाबर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. व्ही.व्ही. पनवेलकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. देसाई आदी उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
लंपी हा आजार विषाणूजन्य असून तो संसर्गजन्य आहे. त्यामुळे याची लागण झाल्यास तो इतर जनावरांपर्यंत पसरण्याचा पसरण्याचा धोका आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये लंपी आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ तालुका पशुसंवर्धन विभाग अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच जनावरं कोणत्याही आजाराने आजारी असेल तरीही त्यावर तात्काळ उपचार करावेत असे जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याबाहेरुन कोणतीही जनावरे जिल्ह्यामध्ये आणली जाणार नाहीत याकरीता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करावी असे आदेश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.

तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी संबंधित तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांसोबत बैठक घेवून लंपी आजाराबाबतची माहिती द्यावी. ग्रामीण भागामध्ये पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतीमार्फत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे अशा सूचना बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिल्या. गुरांना चावणारे गोमाशा, गोचिड, डास यामुळे लंपी आजार होतो. गोठ्यामध्ये किटकनाशकांची फवारणी करणे, गोठ्याची स्वच्छता राखणे, गोठ्यामध्ये धुरी करणे यामुळे या आजाराला प्रतिबंध होवू शकतो अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा करण्यात असून जनावरांना सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत अशी माहिती श्री. यादव यांनी दिली. बैठकीला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, जनावरांचे खाजगी डॉक्टर आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE