नागपूर-मडगाव विशेष रेल्वे गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार

पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरीसह कणकवली कुडाळला थांबे

रत्नागिरी दि. २१: नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.


विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (01139/01140) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी 30 ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.
मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE