जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी रत्नागिरीत कर्मचार्यांची दुचाकी रॅली
रत्नागिरी दि.२१ : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आज रत्नागिरीत दुचाकी रॅली काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत ही रॅली सकाळी सव्वा अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.
देशातील काही राज्यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कर्मचारी त्यासाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत. याविरोधात भविष्यात मोठे आंदोलन करण्यासाठी सूचक इशारा देण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी दुचाकी रॅलीचे आयोजन कर्मचाऱ्यांनी केले होते.
एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन इथून सुरू झालेली कर्मचार्यांची दुचाकी रॅली मारुती मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास धडकली.
शासनाने आपल्या मागणीचा विचार केला नाही तर भविष्यात याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा बुधवारच्या दुचाकी रॅलीतून शासनाला देण्यात आला. विविध संघटना या दुचाकी रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
















