संगमेश्वर पोलिसांकडून तपास सुरू
देवरुख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर गावात बिबट्याची हत्या झाल्याची माहिती पुढे येत असून याचीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना नवरात्रोत्सवादरम्यान दि. ७ रोजी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत वनपाल मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत संगमेश्वर पोलीस तपास करीत असल्याची माहिती दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वाशी हा गाव दुर्गम असून असून सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. या भागात वन्य जीवांच्या शिकारी होत असल्याच्या चर्चा सातत्याने होत असते. नवरात्रोत्सवा दरम्यान बिबट्याची शिकार झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत वाशी पंचक्रोशी- दशक्रोशीत बिबट्याची शिकार झाली असल्याची जोरदार चर्चा नाक्यावर सुरू झाली. याच बाबत वन्य सप्ताहा निमित्त देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात हि बाब समाजिक कार्यकर्तेंनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.पण वरिष्ठांनी ही बाब गांर्भियांनी घेतलेली नसल्याने संगमेश्वर पोलिसांना एका निनावी पत्राने खबर दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान संगमेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पाच संशयिताना ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र संगमेश्वर पोलिसां कडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
वन विभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांच्याशी भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधला असता बिबट्या हत्या झाली या घटनेला दुजोरा दिला. तसेच याचा तपास संगमेश्वर पोलीस करीत असल्याचे सांगून ही घटना पाच सहा दिवसापूर्वी झाल्याचे सांगितले मात्र आपल्या कडे याबाबत काहीच नाही असेही सांगितले.
मिळालेली माहिती आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया यातून बिबट्याची ची हत्या झाल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला आहे. मात्र हा दडपण्याचा प्रकार तर नाही ना? असे एक ना अनेक सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.















