दिवाळी खरेदी, झगमगाट करण्यात पावसाचा व्यत्यय
आकाश कंदीलांनी दुकाने सजली
रत्नागिरी : परतीच्या पावसाने नवरात्र उत्सव तसेच दसरा आटपला तरीही आवरते न घेतल्यामुळे नागरिकांच्या दिवाळी खरेदीच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. दोन वर्षांच्या कालखंडानंतर यावेळी कोरोनामुक्त वातावरणात दिवाळीचा झगमगाट करण्याची इच्छा असूनही चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असतानाही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे ‘दिवाळीची पणती लावायचीय पण ती लावता येत नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिवाळी आता चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा आकाश कंदील, विद्युत रोषणाईचे साहित्य तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. कोरोनामध्ये मागील दोन वर्षांचा कालखंड गेल्याने यावेळी प्रथमच महामारीमुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असल्याने उत्साहाला उधाण आले आहे पण अधून मधून येणारे पावसाने त्यात खोडा घातला आहे.
यावेळी फराळाच्या साहित्यासह आकाश कंदील तसेच फटाके यांच्या दरात वाढ झाली आहे. फराळाच्या दरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पस्तीस टक्के वाढ झाली आहे. यावेळी कोरोनामुक्त वातावरण असल्यामुळे महागाईतही खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.
विविधरंगी पणत्या दाखल
या वेळच्या दिवाळीसाठी बाजारात विविध रंगांच्या तसेच विविध आकारांच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. अगदी पाच दहा रुपयांपासून चारशे ते पाचशे रुपयांपर्यंतचे दिवाळीसाठी ते पणत्या तसेच आकाश कंदील बाजारात उपलब्ध झाले आहेत.




परतीचा पाऊस दिवाळीपर्यंत लांबल्यामुळे दिवाळी साहित्य घेऊन रस्त्यावर विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. रस्त्याकडेला विक्रीसाठी सामान म्हणल्यानंतर गिऱ्हाईकाचे प्रतीक्षा करावी तर प्रत्यक्षात पाऊस हजर होत असल्यामुळे विक्रेत्यांना मांडलेल्या सामानाची पुन्हा आवरा आवर करावी लागते आहे. त्यामुळे अपेक्षित उलाढालीचे लक्ष्य गाठताना विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे.














