लांजात महामार्गावर सापडलेल्या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडले

तपासणी करून सोडले नैसर्गिक अधिवासात

लांजा : येथील  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ येथे असणाऱ्या हॉटेल अनमोलचे मालक अनिरुद्ध कांबळे यांना दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजण्याचा सुमारास खवले मांजर आढळून आले. या घटनेची माहिती वनविभागाला देऊन संरक्षित प्रवर्गात मोडणारे खवले मांजर त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दुर्मिळ प्रवर्गातील या प्राण्याची नंतर तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे खवले मांजर रस्त्यावरुन हलत नसल्याचे श्री. कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी ते खवले मांजर आपल्या हॉटेलमध्ये आणून ठेवले व या संदर्भात उद्योजक किरण सामंत यांना कळविले.
या नंतर सामंत यांनी तत्काळ विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना घटनेची माहिती दिली. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांच्या आदेशानुसार लांजा येथील वनपाल व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. त्यावेळी वेरळ येथे सापडलेल्या खवले मांजरला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याची खात्री करून वनपाल यांनी खवले मांजराला ताब्यात घेतले.

दरम्यान, लांजा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत खवले मांजरची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE