शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाच्या निर्णयांबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

 

मुंबई दि. २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल आपण सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांपूर्वी केली होती व दोन अर्थसंकल्पांतही त्याचा उल्लेख केला होता. परंतु, महाविकास आघाडी सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. विरोधी पक्ष असताना भाजपाने या विषयावर आंदोलनही केले होते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारने याची अंमलबजावणी केली व सहा लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये सरकारने जमा केले.

ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देण्याचा निर्णय झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे व यामुळे नाशवंत शेतीमालाचे काढणी पश्चात होणारे नुकसान कमी होणार आहे. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले दर मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे युद्ध पातळीवर करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचा संवेदनशील आदेश मा. शिंदे व मा. फडणवीस यांनी प्रशासनाला दिला आहे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करत आहे व त्यानुसार हा निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE