तहसीलदारांना निवेदन ; तहसील आवारात शोकसभा. काळया फिती आणि निषेधाच्या जोरदार घोषणा
लांजा : पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात घडवून त्यामध्ये त्यांच्या झालेल्या दुदैवी मृत्यूप्रकरणी शुक्रवार दि.१० रोजी मराठी पत्रकार परिषद शाखा लांजा तालुक्याच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला कठोर शासन होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही यावेळी पत्रकारांनी जोरदारपणे केली.
रिफायनरी विरोधात वृत्तांकन केल्यामुळे शशिकांत वारिशे यांना या भ्याड हल्ल्यात जीव गमावावा लागला. घातपात करून केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ लांजा तहसीलदारांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी लांजातील पत्रकारांनी केली. पत्रकारांकडून काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज करण्यात आले. लांजा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात शोकसभा घेऊन याप्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याकरिता लांजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निषेधाची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार सरंक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटनेचा आम्ही लांजातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा. या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत (जलदगती न्यायालयात) व्हावी. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे.
यावेळी लांजा तालुका मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश कदम, तालुकाध्यक्ष सिराज नेवरेकर, जिल्हा प्रतिनिधी संजय साळवी, तालुका उपाध्यक्ष रवींद्र साळवी, खजिनदार संतोष कोत्रे, कार्यकारिणी सदस्य गोविंद चव्हाण, नसिर मुजावर आदींसह पत्रकार उपस्थित होते.
















