अलिबाग : महाड मधील चवदार तळे सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापन दिनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. महाड-पोलादपूर-माणगावचे आमदार भरत गोगावले व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस मानवंदना देण्यात आली.
यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण विभागाचे सहसचिव दिनेश इंगळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, कोकण विभाग वंदना कोचुरे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
चवदार तळे सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापन दिनासाठी दि.19 मार्च पासून आंबेडकरी जनता महाड मध्ये येण्यास सुरुवात झाली होती. दि.20 मार्च रोजी चवदार तळे ते क्रांती स्तंभ पर्यंतच्या रस्त्यावर दूतर्फा बाबासाहेबांची पुस्तके, मूर्ती व इतर साहित्यांची दुकाने लागलेली होती, त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्थानिक प्रशासनाकडून तसेच स्वयंसेवी संघटनांकडून येणाऱ्या भीम अनुयायींसाठी पाणी, नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.त्यामध्ये कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था ( महाराष्ट्र ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, रायगड युनिट यांच्या वतीने सामुदायिक भोजन दान, ओ.एन.जी.सी मुंबई व ऑल इंडिया एस.सी तथा एस.टी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन,ओ.एन.जी.सी, मुंबई यांच्या वतीने नाष्टा व पाणी, भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले होते.
क्रांती स्तंभासमोरील मैदानावर विविध आंबेडकरी संघटनांच्या सभा दिवसभर सुरु होत्या. ठिकठिकाणी विविध संघटना, राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. हजारोंच्या संख्येने आलेल्या आंबेडकरी जनतेसाठी नगरपरिषदेच्या वतीने स्नानगृह, शौचालय, निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर विविध जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था चांदे क्रीडांगण, आय.टी.आय मैदान, म्हाडा व नवेनगर येथील मैदान, एस.टी स्थानकासमोरील जागेत करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



