कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासात 27 लाखांची रोकड लुटणारे चोरटे गजाआड
जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी स्थानकावर घडली होती घटना
रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान सोने व्यापार्याची तब्बल 27 लाख 86 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना दि. 1 मे रोजी घडली होती. यातील सहा संशयित चोरट्यांना अवघ्या आठवडाभरातच गजाआड करण्यात रत्नागिरी पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. सांगली येथून घटनेतील चोरट्यांना पकडण्यात आले.
पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत शंभर टक्के रोख रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यात वापरलेली 5 लाखांची गाडी असा एकूण 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरज हसबे, (22, मूळ रा. सांगली सध्या रा. केरळ), उमेश सूर्यगंध (34), अजय शिंदे (21), तुषार शिंदे (22), यश वेदपाठक (19) आणि विकास चंदनशिवे (23, सर्व रा. खानापूर, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चोरीची ही घटना 1 मे 2022 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे घडली होती. प्रशांत भिमराव माने आणि विनोद रावसाहेब महिम हे दोघे कोकण रेल्वे मार्गे धवणार्या जामनगर-तिरुनेलवेली या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसने रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करत होते. ते सोने तपासणी करण्याचे हॉलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी ते आपल्या जवळील बॅगेमध्ये 27 लाख 86 हजार रोख रक्कम घेऊन जात होते. बॅग ठेवून ते बाथरुमध्ये गेले असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली. बाथरुममधून बाहेर आल्यावर त्यांना आपली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांकडे या बाबत तक्रार दिली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलिस उप निरीक्षक आकाश साळुंखे, पोलिस हवालदार प्रवीण बर्गे, पोलिस नाईक गणेश सावंत, विलास जाधव, सावंत, भालोकर, नार्वेकर यांनी केली.