गिरीश बापट यांनी पक्षाच्या उभारणीत अमूल्य योगदान दिले

मुंबई, 29 मार्च 2023 :  खासदार गिरीश बापट यांचे पक्षाच्या उभारणीतील त्यांचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा. बापट यांना आदरांजली वाहिली आहे.

 बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अफाट जनसंपर्क, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेली कटीबद्धता यामुळे गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. कसबा विधानसभा मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या बापट यांनी सामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावून आदर्श लोकप्रतिनिधी कसा असतो हे दाखवून दिले.

खा. बापट यांना पुण्याच्या समस्यांची नेमकी जाण होती या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असत. जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या बापट यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च महत्व दिले. पक्षाने दिलेल्या आदेशांचे शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे पालन करणाऱ्या बापट यांनी सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळ, महापालिका या व्यासपीठांचा प्रभावी वापर केला पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सदैव स्मरणात राहील असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE