रत्नागिरी : रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थानाच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन आज राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. रत्नागिरी नगर परिषदेच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतंर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी शासनाकडून 4.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, ॲङ
दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगरसेवक राजू तोडणकर, सुशांत चवंडे, श्रीमती करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्यवीर आपली शक्तीस्थाने आहेत 01 ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी केलेल्या घोषणेनुसार सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सुशोभिकरणाचे पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान दररोज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील याबाबत आदेश काढण्याकरीता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील असेही श्री. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीमध्ये 100 वर्ष जुने लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय असून या ग्रंथालयाचे सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये रत्नागिरीतील विमानतळाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव देण्याबाबतच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच कोकणातील पहिल्या इंजिनिअरींग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्याला सहा भारतरत्न लाभले आहेत या भारतरत्नांचे कार्य देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना तसेच पुढच्या पिढीला अवगत व्हावे याकरीता एक वेगळे उद्यान रत्नागिरीमध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी मंत्रीमहोदयांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले. यावेळी ॲङ दिपक पटवर्धन व राहुल पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले.
रहाटाघर बसस्थानकाचे सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन
जिल्हा नियोजन समिती योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातील रहाटाघर बसस्थानकाचे डांबरीकरण व सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
