प्रकल्प विरोधकांकडून रिफायनरी सर्वेक्षणाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चा करायला सदैव तयार आहे. प्रशासन गावामध्ये येवूनही ग्रामस्थांशी चर्चा करायला तयार आहे, तरी ग्रामस्थांनी प्रशासनाशी सकारात्मक चर्चेसाठी,सनदशीर मार्गाने सर्वांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


मौजे बारसू, ता.राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावित गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम मंगळवार, 25 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे. आजही हे काम सुरू होते, मात्र काही ग्रामस्थ यास विरोध दर्शवित आहेत. त्यांना वस्तुस्थिती समजाविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.
आज सर्वेक्षण ठिकाणी खासदार विनायक राऊन यांनी भेट देवून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. खासदार राऊत स्वतः सर्वेक्षण ठिकाणी बसून राहिले होते, त्यांना नंतर राजापूर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
जवळपास 500 ते 600 जणांच्या जमावाने सर्वेक्षण ठिकाणी येवून काम बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परिस्थिती कौशल्याने हाताळून नियंत्रणात आणली.


आजअखेर 5 ड्रिल पूर्ण झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री.प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जमाव ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जावून ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेदरम्यान ग्रामस्थ निघून गेले.
जिल्हा प्रशासन ग्रामस्थांशी चर्चा करायला सदैव तयार आहे. प्रत्यक्ष गावामध्ये येवूनही प्रशासन ग्रामस्थांशी चर्चा करायला तयार आहे. तरी ग्रामस्थांनी प्रशासनाशी सकारात्मक चर्चेसाठी,सनदशीर मार्गाने सर्वांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE