देवरूख (सुरेश सप्रे) : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवलीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॅकद्वारे घेण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीत B++ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाशी सलग्नित असणाऱ्या या महाविद्यालयाने, २०१७ साली मूल्यांकनाच्या पहिल्या फेरीत २.०९ CGPA गुण मिळवत B श्रेणी मिळवत नॅक मूल्यांकन असणारं कोकणातील पहिलं फार्मसी महाविद्यालय होण्याचा बहुमान मिळवला होता. त्या नंतर गेली ५ वर्षे दर्जेदार शिक्षणावर भर देत दुसऱ्या फेरीसाठी पुनर्मूल्यांकन करायचे केले.

नॅक द्वारे नियुक्त केलेल्या तीन तज्ञ आणि प्रतिष्ठित मूल्यांकनकर्त्यांचा समावेश असलेल्या निरीक्षण समितीने दि. १० आणि ११ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयास भेट दिली. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन दर्जा, केले जाणारे संशोधन, नाविन्यपूर्ण शिक्षण, राबवले जाणारे समाजउपयोगी उपक्रम, महाविद्यालयाचे दुरष्टीकोन आणि भविष्यातील धोरण, शिक्षकांचा दर्जा, मूलभूत सोई सुविधा इत्यादीच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, १००% घेतला जाणार अभासक्रम, सुसज्य ग्रंथालय, दिली जाणारी प्लेसमेंट तसेच इतर गोष्टींबरोबरच औद्योगिक क्षेत्राशी असणारे महाविद्यालयाचे संबंध, दिल्या जात असणाऱ्या सुविधा याबद्द्ल मूल्यांकनकर्त्यांकडून विशेष प्रशंसा मिळवली. सदर झालेल्या पुनर्मूल्यांकन फेरीत B,++ श्रेणी आणि २.९५ गुणांसह, संपूर्ण कोकणात असणाऱ्या फार्मसी महाविद्यालयांनामध्ये सर्वाधिक CGPA गुण घेण्याचा बहुमान या महाविद्यालयाने घेत आपले वैशिष्ठ अबाधित ठेवले आहे.
आएसओ ९००१:२०१५ मानांकन, सलग तीन वर्षे AICTE CII गोल्ड रँकिंग, विद्यापीठ अनुदान आयोगाची २ (f) मान्यता घेत, संस्थाध्यक्ष रवींद्र माने व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. साडवलीसारख्या ग्रामीण भागात असूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महाविद्यालयाने आपले वेगळेपण निर्माण केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल ब. खाडे यांनी संस्था अध्यक्ष रवींद्र माने आणि संस्था पदाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.
अजिंक्य मोरे यांनी या नॅक मान्यतेसाठी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक म्हणून काम केले.
