रिफायनरी समर्थन मोर्चालाही प्रशासनाची परवानगी नाही
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून विरोध आणि समर्थन या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर घामाचा सुरू असलेल्या बारसू रिफायनरीच्या ठिकाणी दि. ६ मे रोजी उद्धव ठाकरे यांना सभा घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या समर्थन मोर्चाला देखील प्रशासनाने परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.
याच प्रकाराच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू परिसरात येऊन प्रकल्पग्रस्तांची संवाद साधणार असल्याचे जाहीर केले होते. तर प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या गटाकडून ठाकरे यांनी लोकांना ठाकरे यांनी भडकाऊ असे सुनावतानाचा ठाकरे यांनी या भागात येऊनच दाखवावे असे आव्हान दिले होते. मात्र तरीही दिनांक सहा मे रोजी उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प होत असलेल्या भागात येण्याचा निर्धार कायम ठेवल्यामुळे ते दिनांक सहा मे रोजी राजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर विरोधी गटाकडून प्रकल्प क्षेत्रात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला. प्रकल्प क्षेत्रात जाण्यास मनाई असतानाही या भागात विरोधकांनी प्रस्तावित प्रकल्प विरोधात आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केल्याने काही दिवसापूर्वीच प्रशासन आणि आंदोलक यांच्यात खडाजंगी झाली होती.
दरम्यान, विरोध आणि समर्थन या दोन्ही गोष्टी तीव्र बनत चालल्यामुळे प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी समर्थन मोर्चा आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. सभेला परवानगी नाकारल्यामुळे उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी दहा वाजता प्रकल्प होत असलेल्या राजापूर तालुक्यात येऊन केवळ प्रकल्पग्रस्तांची संवाद साधून कातळ शिल्पांना भेटी देऊन जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.















