रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरातील इंधन पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी दिवसा तसेच रात्री रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.
रत्नागिरीतील जेके फाईल नजीक एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सीएनजी स्टेशनसह रेल्वे स्टेशन समोरील माने पेट्रोल पंपात देखील पर्यावरण पूरक सीएनजी गॅस वरून घेण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक वाहनधारकांच्या रंगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. जेके फाईल्स कंपनी समोरील सीएनजी रिफील पंपा समोर सीएनजी आधारित रिक्षांसाठी स्वतंत्र रांग पाहायला मिळत आहे. एमआयडीसी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर यामुळे वाहनांची गर्दी बघायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सीएनजी भरून घेण्यासाठी उभ्या असलेल्या रिक्षांसाठी सीएनजी पंपानजीकच्या अंतर्गत रस्त्यावर रिक्षाची रांग लावली जात आहे.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तसेच आजूबाजूची पर्यटन स्थळे पाहण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत. उन्हाळी सुट्टीमुळे लोक लहान मुले तसेच कुटुंबीयांसह रत्नागिरीच्या पर्यटन भेटीवर आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी इंधन भरून घेण्यासाठी पाहायला मिळत आहे.

लग्न सोहळ्यांनी हॉल गजबजले

पर्यटकांच्या गर्दी बरोबरच रत्नागिरी शहराचा आजुबाजूच्या अनेक इव्हेंट हॉलमध्ये लग्न तसेच रिसेप्शन सोहळ्यांच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. चालू महिन्यात असलेल्या शुभ मुहूर्तावर लग्न सोहळे उरकून घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे पाहायला मिळते आहे. या एकूणच परिस्थितीमुळे पर्यटकांसह विवाह तसेच रिसेप्शन सोहळ्यानिमित्त रत्नागिरी शहर परिसरातील हॉल गजबजलेले बघायला मिळत आहेत.
