कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा अखेर संपली
रेल्वेच्या संबंधित विभागांना अलर्ट राहण्याच्या सूचना
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची ‘ट्रायल रन’ कोकण रेल्वे मार्गावर होणार आहे. मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर दि. १६ मे रोजी ही चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सध्याची तेजस एक्सप्रेस बंद होते की, वेळापत्रक बदलून सुरूच ठेवले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

देशभरातील विविध मार्गावर मेक इन इंडिया अंतर्गत भारतात विकसित करण्यात आलेली अलिशान वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली आहे. देशातील पहिली तेजस एक्सप्रेस ज्या कोकण रेल्वे मार्गावर धावली त्या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस नेमकी कधी धावणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच मागील काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखील लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सांगितले होते.
अखेर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची ही प्रतीक्षा संपली आहे. दि. १७ मे रोजी सीएसएमटी ते मडगाव स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन घेतली जाणार आहे. या संदर्भात सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दि. १६ मे २०२३ रोजी १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस पहाटे ५.३५ वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून गोव्यात मडगावला ते दुपारी २.३० वाजता पोहोचणं अपेक्षित आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची ट्रेन असल्यामुळे तिच्या ट्रायल रन दरम्यान रेल्वेच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अँड टी सुपरवायझर्स या सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस त्याच रात्री म्हणजे दिनांक १६ मे रोजी रात्री अकरा वाजता पुन्हा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणे अपेक्षित आहे.
