यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार योजना
ठाणे (सुरेश सप्रे) : राज्य शासनाचा यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३चा राज्यस्तर व विभागस्तरावर देण्यात येणारा यशवंत पंचायत राज पुरस्कारात (कोकण विभागात) संगमेश्वर पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे..
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांना सन २००५-२००६ या आर्थिक वर्षापासून विभागस्तर व राज्यस्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.
. पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना यावर्षी देखील राबविण्यात आली. सदर अभियानांतर्गत राज्यातील अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्या पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवड करण्यात येते. तसेच विभागस्तरावर तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सदर निवड करण्यासाठी तालुकास्तरावर जिल्हास्तरावर,विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आलेली होती.
विभागस्तरीय मूल्यांकन समितीने शिफारस केलेल्या प्रत्येक विभागातून प्रथम आलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची या विभागाच्या निवड समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदला बदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आली .
राज्यस्तरावर अत्युत्कृष्ट पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्य समितीची दिनांक २२ मे, २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय पारितोषक निवड समितीने राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी करू प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या कोकण विभाग पुरस्कारासाठी पंचायत समिती संगमेश्वर जि. रत्नागिरी ने प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन करत कोकणात आपला वेगळा ठसा उमटवला. व्दितीय क्रमांक पंचायत समिती मालवण जि. सिंधुदुर्ग तर तृतीय क्रमांक पंचायत समिती शहापूर जि. ठाणे यांनी प्राप्त केले.
संगमेश्वर पंचायत समिती ने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्याची व जिल्हाची शान वाढवली आहे. जया माने यांचे सभापतीपदाच्या कार्यकाळात झालेल्या कामकाज व कामे यांचे मूल्यांकन करण्यात आले होते.. सभापती जया माने यांनी पक्षिय भेद व राजकारण न करता सर्वांना बरोबर घेत केलेल्या कामाचे हे फलित असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
