रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर १६ जूनपर्यंत चक्रीवादळाची टांगती तलवार!

पर्यटकांसह नागरिकांनी किनार्‍यांवर न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन


रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. खवळलेल्या समुद्रात उंच लाटा उठत असून किनार्‍यांवर धडका देत आहेत. त्यामुळे गणपतीपुळसह रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे, नेवरे या किनार्‍यांवर पर्यटकांनी पाण्यात उतरु नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोकणला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मागील तीन-चार दिवसांपासून बिपरजॉय वादळाचा परिणाम किनार्‍यावर जाणवत आहे. रविवारी भरतीच्यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेने तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असणार्‍या गणपतीपुळे येथे मोठा तडाखा दिला होता. यात अनेक पर्यटक पाण्याबरोबर सुमारे 25 फूट किनार्‍याकडे ढकले गेले होते. रस्ता आणि किनार्‍याच्यामध्ये असणार्‍या संरक्षक भिंतीवर उभे असणारे पर्यटकही लाटेच्या मार्‍याने खाली पडले होते. यात किनार्‍यावरील व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

रत्नागिरीतील भगवती जेट्टी येथील ब्रेक वॉटर वॉलवर चक्रीवादळामुळे सोमवारी निर्माण झालेली परिस्थिती.


सोमवारीही वार्‍याचा जोर कायम होता व समुद्र खवळलेला होता. गणपतीपुळेसह तालुक्यातील आरेवारे, भाट्ये, मांडवी, नेवरे या किनार्‍यांवरही लाटांचा प्रचंड मारा होत होता. भरतीच्यावेळी लाटा किनार्‍याला भिडत होत्या. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही किनार्‍यावर जाऊन पाण्यात उतरु नये असे आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतून आलेले पर्यटक खवळलेल्या समुद्रातही पाण्यात उतरण्यासाठी धडपडत असतात, परंतु अतिरेकपणा करुन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणपतीपुळे येथे पोलीसही लक्ष ठेवून आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE