हाती धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत असायला हवे : अभिजित हेगशेट्ये

नवनिर्माण शिक्षण संस्थेत राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन ; ८ जुलैपर्यंत कार्यशाळा

रत्नागिरी : माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत असायला हवं. संपूर्ण जग लिंगभेद मानत नसताना मुली असुरक्षित असणं हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी केले. राज्य शासनाच्या महिला व बालविकास कक्ष आणि नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण वप्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुवार दि. ६ जुलै रोजी संस्थेच्या बृहत भारतीय सभागृहात या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील १००० मुलींना येत्या ६ ते ८ जुलै या काळात स्वसंरक्षणाचे धडे आणि प्रात्यक्षिक शिकवले जाणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उदघाटन नवनिर्माण संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अध्यक्षस्थानी अभिजित हेगशेट्ये,संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर. बी. काटकर, सायबरसेलचे नितीन पुरळकर, नजमा मुजावर, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशक जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी हेगशेट्ये म्हणाले, सोळाव्या शतकात महिलांच्या सुरक्षित जीवनाचे धडे राजमाता जिजाऊंच्या तालमीत छ. शिवरायांनी गिरवले. त्याचा परिणाम असा झाला की, शिवरायांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हातपाय कलम केले. अशी शिक्षा दिल्याने महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस त्यावेळी कुणाचे झाले नाही. महिलेचे संरक्षण करणं आणि तिचा सन्मान करणं हा वारसा १६ व्या शतकापासून महाराष्ट्रला शिवरायांनी घालून दिला आहे. हाच वारसा जपायला हवा. तो वारसा जपताना महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोरात कठोर आणि तात्काळ शासन व्हायला हवे.

यावेळी प्राचार्या डॉ आशा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करुन मुलींचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. काटकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले. आभार प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

रत्नागिरी : कार्यशाळेत बोलताना चेअरमन अभिजित हेगशेट्ये, सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर. बी. काटकर, सायबरसेलचे नितीन पुरळकर, नजमा मुजावर, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशक जान्हवी पाटील.

उदघाट्नच्या भाषणात बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक ध धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. मुलींनी आपली माहिती सामाजिक उघड करणे धोकादायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आई वडील हेच आपले पहिले मित्र असल्याने आपल्यावर अत्याचार होत असेल तर आईवडिलांना विश्वासात घेऊन सांगायला हवे. त्याचवेळी पोलीस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर संपर्क साधायला हवा, असे केल्यास पोलीस तक्रार केल्यापासून आठ ते दहा मिनिटात तुमच्या मदतीला येतील. आणि पोलीस आले नाहीत तर आमच्याकडे तक्रार करा. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी हमी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE