गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करणार : सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी
रत्नागिरी : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच्या दौऱ्यावेळी जाहीर केल्यानुसार शुक्रवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा पाहणी करता दौरा सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून हा दौरा सुरू झाला असून ठीकठिकाणच्या कामाची पाहणी करत बांधकाम मंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच न्यायालयाने देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत ताशेरे मारले आहेत. काही महिन्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा राज राष्ट्रीय महामार्गाची हवाई पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी येत्या डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण एका मार्गीकेचे काम पूर्ण होऊन ती वाहतुकीसाठी खुली होईल, असे सांगितले होते.
त्या पाठोपाठ आता महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी शुक्रवारी महामार्गाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. येत्या गणेशोत्सवा पूर्वी या महामार्गाच्या एका मार्किकेचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम मार्गी लावण्यासाठी दिवसाला अर्धा किलोमीटर याप्रमाणे कामाचा उरक करणाऱ्या मशिनरी युद्धपातळीवर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मशीन्स उपलब्ध झाल्यास त्याद्वारे या कामाला आणखी गती देण्याची तयारी ठेकेदार कंपनीने दर्शवली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांनी सांगितले.