पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा : नीलेश राणे

  • भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे केले अभिनंदन

रत्नागिरी : कुठलाही पक्ष हा कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमुळे बळकट होतो, त्यामुळेच नेतृत्व भक्कम होते. राजेश सावंत यांच्या रूपाने दक्षिण रत्नागिरीसाठी एक चांगले नेतृत्व पक्षाने दिले आहे. त्यांना साथ द्या आणि आगामी निवडणुकीमध्ये पक्षाचा विजयाचा झेंडा सर्वत्र फडकवा, तुमच्या सोबत मी कायम आहे असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी राजेश सावंत यांची निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे आज रत्नागिरीत आले होते. या निमित्ताने भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी मार्गदर्शन केले. भाजपा पक्षाचे नेहमीच देशविकासाचे व्हिजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले हेच व्हिजन, त्यांच्या नेतृत्वाखाली होणारा विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, सामान्यांच्या विकासासाठी आपल्याला काम करायचे आहे. अशावेळी थेट लोकांपर्यंत पोहोचणारा पक्षाचा कार्यकर्ता महत्वाचा असतो. तोच पक्षाला बळकट करतो आणि नेतृत्वाला लढण्याचे बळ देत असतो. राजेश सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आजपर्यंत उत्तम काम केले आहे. एक चांगल नेतृत्व त्यांच्या रूपाने दक्षिण रत्नागिरीला मिळाले आहे. त्यांना साथ द्या, त्यांचे हात बळकट करा, पक्षाप्रती निष्ठा ठेवा, तरच आगामी निवडणुका आपण लढून जिंकू असा आत्मविश्वास निलेश राणे यांनी दिला. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे आम्ही आजवरची वाटचाल केली आहे, तुम्ही केव्हाही हाक मारा, तुमच्यासाठी मी कायम असेन अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. राजेश सावंत यानाही त्यांनी सहकार्याचा शब्द दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महेश उर्फ मुन्ना खामकर, राजू मयेकर, यांच्यसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजेश सावंत यांनीही निलेश राणे यांचे स्वागत केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE