आधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम वेगाने सुरु
रत्नागिरी : मागील काही वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेली शहरातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारी सिग्नल यंत्रणा लवकरच पुन्हा एकदा सुरू झालेली पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरी शहरात मारुती मंदिर, जेल रोड, शासकीय रुग्णालय, जयस्तंभ, राम नाका, गोखले नाका तसेच गाडीतळ या वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक नियमन करणारी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र मागील काही वर्षांपासून ते नादुरुस्त अवस्थेत आहे.
नवीन सिग्नल यंत्रणा अद्ययावत
शहरातील जुनी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याऐवजी आता आधुनिक पद्धतीची यंत्रणा बसवली जात आहे. महानगरातील सिग्नल यंत्रणेप्रमाणे ही सिग्नल यंत्रणा आहे. सध्या जेलरोड येथे नवीन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित ठिकाणचे काम देखील लवकरच पूर्ण होऊन वाहतूक नियमन करणारी तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारी ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे.
