- देवस्थानकडून मंदिरात फुलांची आकर्षक आरास
रत्नागिरी : महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात रविवारी श्रावण वद्य चतुर्थी ( संकष्टी चतुर्थी ) निमित्त फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात संकष्टी चतुर्थी दिनी भाविकांचा नेहमीच ओघ पाहायला मिळतो. रविवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रींच्या मंदिरात गाभाऱ्यासमोर विविधरंगी फुलांची नेत्रसुखद अशी आरास केली होती.

दरम्यान, संकष्टी चतुर्थीनिमित्त दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. रविवारी वातावरण मोकळे असल्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक भाविकांनी मंदिरालगतच्या चौपाटीवर फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
